परवा एका समारंभाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’चे सुधीर जोगळेकर यांची गाठभेट झाली. मराठीतल्या दोन साधम्र्यधारक शब्दांचा अर्थ विषद करताना सुधीर जोगळेकर म्हणाले, ‘माणसाचा प्रवास हा मातेकडून मातीकडे होतो. एक माता- उदरात सांभाळते आणि दुसरी माती- मृत्युपश्चात कवेत घेते. या दोन्ही शब्दांत फरक असतो तो फक्त एका वेलांटीचा. ही वेलांटी म्हणजे खरे तर आपलं आयुष्य असते.’
पण वेलांटीची ही खोली आपल्याला उमगतच नाही. आपण बसतो, आयुष्यात उभ्या-आडव्या कोलांटय़ा घेत. आपल्याला ना मातेचे श्रम समजतात, ना मातीचे श्रेय उमजते! कळत-नकळत अनेकदा आपण या दोघांचा अनेकदा अपमान, उपमर्द आणि उपेक्षा करतो. पुष्कळशा प्रसंगात आपण त्यांना गृहीत धरतो. त्यांचे अस्तित्व हे जणू आपले ‘असणे’ अधिक सुखकर व्हावे यासाठीच असल्यासारखे वागतो. आपल्यासाठी ‘सुखकर्ता; दु:खहर्ता’ होणाऱ्या या माता-मातीसाठी. आरती ओवाळणे तर दूरच, त्यांना चार कौतुकाचे शब्द वाहाण्यातही आपण करंटे ठरतो. वडिलांचा धाक वाटतो, आईचा आधार असतो. वडील काय म्हणतील, याची धास्ती असते; आई काही म्हणाली तरी शेवटी माझ्याच मनाप्रमाणे वागेल, हा दिलासा असतो. वडील ही अनाकलनीय कात्री, तर आई ही आश्वस्थ खात्री असते. व्यवहारात वडील सिकंदर असतीलही, पण घरातल्या प्रत्येक वादळात आई हीच भक्कम आधार असते. वडील एखादे वेळी फणसाचा गरा निघतील, पण आई ही नेहमीच करंजीतल्या खोबऱ्याचे सारण असते.
आणि अशा या आईवर आम्ही करवादतो, खेकसतो, तिला रडवितो आणि ती रडताना पाहिली की, आम्हीही रडतो. पण काही क्षणा-दिवसांनंतर पुन्हा पाढे पंचवीस. आईचे आणि आमचे अद्वैत असते, पण ते खऱ्या अर्थाने कळते तेव्हा ती खूप दूर निघून गेलेली असते. तेव्हा पाऊस निनादत नाही, तर आभाळालाही टाहो फोडावासा वाटतो. त्रलोक्याचे स्वामी असलेले आम्ही तेव्हा खऱ्या अर्थाने भिकारी होतो. आठवणींचे कढ येतात, गळा दाटून स्वर येतात, परत येत नाही ती आई. मग या आयुष्याच्या वेलांटीत कधी तरी स्वल्पविराम घेऊन आम्ही तिच्यासाठी कौतुकाची चार उद्गारवाचक चिन्हे काढायला नकोत का?
जी अवहेलना मातेची, तीच कहाणी मातीची. आमच्या डगमगणाऱ्या पावलांना ती स्थिर करते. लहानपणी आम्ही तिच्या उरावर किल्ले बांधतो, खडूने चौकटी आखून छापा-पाणी खेळतो, एक रेष आखून तळ्यातून-मळ्यात जातो, न ओलांडायच्या लक्ष्मणरेषांचीही तीच साक्षीदार असते. धरणे, जलाशये, बागा, इमारती साऱ्यांना ती आधारभूत ठरते. पण आमची हपापलेली वृत्ती आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. आम्ही शे-दोनशे मीटरचे इमले तर तिच्या जिवावर उभे करतोच, पण तिच्याच अंतरंगात खोदकाम करून दोन-तीन मजले खोलवर बोगदे, स्टेशने आणि रेल्वे बांधतो. कारण आमच्या लेखी ती फक्त एक भूखंड असते. सात-बाराच्या उताऱ्यात ती बंदिस्त असते. खोदकाम केल्यावर कधी निर्मळ पाण्याचा झरा मिळतो. वास्तविक पाहता ते तिचे आमच्यावरचे नि:स्सीम, निर्मळ प्रेम असते. आम्ही मात्र याऐवजी तेल मिळाले असते तर किती बरे झाले असते, हा दांभिक, व्यवहारी विचार करतो. ‘सुईच्या अग्रावर मावेल एवढीही भूमी देणार नाही,’ म्हणताना आमच्या मनात तिच्याविषयी आदर नसतो, आमच्याबद्दल आग्रही दर्प असतो. तिचा ऊर फोडण्यासाठी आम्ही वेगवेगळी साधने बनवितो आणि कधी तिने नुसती कूस बदलून अंगडाई जरी घेतली तरी आमचे होत्याचे नव्हते होते. आमचा उभा जन्म आम्ही तिच्या उरावर उभे राहण्यात आणि उंची गाठण्यात घालवतो. आणि मृत्यू आल्यावर मात्र आडव्या अवस्थेत तिची खोली गाठतो. मातीशी आमचे खरे नाते काय असते ते कळायला आम्हाला मातीतच मिसळायला लागते आणि ती अवस्था प्राप्त झाल्यावर आमची मर्त्य नाती म्हणतात- ‘त्याची माती झाली!’
माता आणि माती या दोन्ही मातुल गृहांचे स्थान जेव्हा एकवटते, तेव्हा आपल्याला आपल्या राष्ट्रभूमीचे आणि आपले खरे नाते उमगते. हा देश मला केवळ नागरिकत्वच देत नाही, तर तोंडात घास, ओठात पाणी, श्वासात हवा आणि टेकायला निवारा देतो. अमर्याद, अथांग आसमानाची छत्री देतो आणि पथारी पसरायला काळीभोर सुजराम्-सुफलाम् माती-माय देतो. आयुष्याची वेलांटी काढताना कधीतरी थबकून या देशाच्या भूमीचे ऋण व्यक्त करणे, हे आपले परम कर्तव्य करावे. देशाचीही आपल्याकडून अवास्तव, अवाजवी अपेक्षा नाही. त्याने आजवर अनेक अराजके, अनागोंदी अन् आक्रमणे साहिली आहेत. परकीयांच्या हस्तक्षेपाला तो कधीच डगमगला नाही. स्वकीयांच्या लाथाळ्यांनी मात्र तो व्यथित होतो. त्याचे आपल्याकडे मागणे लई नाही. तो फक्त सदाचाराचा भुकेला आहे. त्याला सार्वभौमत्वाचा हव्यास नाही, साहचर्य आणि सौहार्दतेचा ध्यास आहे. भ्रष्टाचाऱ्याची भिंगरी कधी एकदा सुटेल अन् मातेकडून मातीकडे जाताना मानवाला त्याच्या मर्त्य जीवनाचा खरा अर्थ उमगेल या विवंचनेत तो आज उभा आहे- वाट पाहात!
खूप काही करण्याची जबाबदारी आता आपली आहे.
- डॉ. संजय ओक