Wednesday, August 12, 2009

वेळ आरोग्याबाबत जागरूक होण्याची

सध्या "स्वाइन फ्लू'ने खळबळ माजविली आहे. यापूर्वीही बर्ड-फ्लू, डेंगी, चिकन गुन्या अशा रोगांमुळे अशीच खळबळ माजली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे; परंतु अशी परिस्थिती उद्‌भवूच नये, यासाठी काय करता येईल, हे सध्याच्या पार्श्‍वभूमीवर पाहणे औचित्याचे ठरेल. योग्य आहार, व्यायाम, मैदानी खेळ व योगशास्त्र यांच्या माध्यमातून आपण वरील सर्व आजारांशी सर्वार्थाने सामना करू शकतो.
प्रदूषण, मनोविकार, चुकीचा आहार, व्यायामाबद्दल अनास्था व अभाव, जहा औषधे यांमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत दुर्बल होते. त्यातच भर म्हणजे रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी कमी असणे किंवा रक्तक्षय असणे. तसेच "व्ही ओटू मॅक्‍स' (त-ज२ चरु) म्हणजे प्राणवायूचे जास्तीत जास्त आकारमान वापरण्याची शरीराची क्षमता कमी असणे; अशा सर्व व्यक्तींना असे आजार होण्याची दाट शक्‍यता असते.
आता प्रश्‍न असा आहे, की जंतुजन्य विकारांच्या बाबतीत फक्त जंतूंचाच विचार करणे पुरेसे आहे का? याचे उत्तर आपल्या शरीरातील अंगभूत अशा रोगप्रतिकार यंत्रणेत दडलेले आहे. या यंत्रणेला "इम्यून सिस्टिम' म्हणतात. ती म्हणजे शरीरात सतत कार्यरत असलेला अत्यंत निष्णात असा डॉक्‍टरच आहे! कोणत्याही अस्वास्थ्याचा मागोवा घेऊन त्यावर परिणामकारक इलाज करणारा, शरीरांतर्गत संतुलन कायम राखणारा डॉक्‍टर.
आपण सर्वांनी सर्वार्थाने जर या डॉक्‍टरची किंवा सिस्टिमची काळजी घेतली, तर केवळ जंतूच नव्हे; तर जंतू वाढायला पोषक अशी परिस्थितीसुद्धा आपण आपल्या शरीरात निर्माण होऊ देणार नाही. "व्हायटल फोर्स हिल्स'ही आयुर्वेदातील व योगशास्त्रातील "स्वस्थवृत्त' संकल्पना म्हणजे या रोगप्रतिकार यंत्रणेची कार्यक्षमता टिकविण्याचे मार्गदर्शनच आहे. योगशास्त्रामध्ये जी योगासने सांगितली आहेत, त्यामुळे शरीरातील पेशींचे मंथन होऊन नको असलेली अशुद्ध द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम फारच प्रभावीपणे पार पाडले जाते. विविध तऱ्हेच्या आसनांमुळे श्‍वसन संस्था, अभिसरण संस्था व प्रतिकार यंत्रणा फारच कार्यक्षम होतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार घातल्यास, शरीरामध्ये ड जीवनसत्त्व तयार होते, ज्याचा उपयोग आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम साठविण्यासाठी व पोचविण्यासाठी होतो.
तांबड्या व पांढऱ्या पेशी बनविण्यामध्ये आपली हाडे सतत व्यग्र असतात. यामुळेदेखील या यंत्रणेमध्ये संतुलन साधू शकते. सूर्यनमस्कार व योगासनांमुळेदेखील "व्ही ओटू मॅक्‍स' वाढू शकतो. प्राणायामामुळे छातीमध्ये प्राणशक्तीचे संचलन होऊन श्‍वसन संस्थेच्या साह्याने वातावरणातील वायुरूपशक्ती शरीरात येते व त्यामुळे उत्तम दमश्‍वास मिळतो. आपल्या शरीरातील ही रोगप्रतिकार यंत्रणा आपला दमश्‍वास, प्रतिकारशक्ती व स्टॅमिना यावर अवलंबून असते. याच प्राणशक्तीमुळे श्‍वसन शक्‍य होते आणि शरीरातील जोम किंवा ताकद यामुळेच वाढते. ही शक्ती जेव्हा निघून जाते, त्या वेळी आयुष्य संपते आणि ज्या वेळी कमी होते, त्या वेळी शरीरामध्ये अनेक आजारांचे व व्याधींचे संचलन चालू होते; तसेच मोकळ्या हवेत अथवा मैदानावर निरामय स्थितीत नियमाने व्यायाम केल्यास वजन आटोक्‍यात राहून शरीराची हालचाल करण्याकरिता लागणारी ऊर्जा जास्त खर्च न होता, या ऊर्जेचा उपयोग पर्यायाने रोगप्रतिकार यंत्रणेवर होणारच; कारण जास्त वजन म्हणजे जास्त ऊर्जा खर्च होणार. आठवड्यातून एकदा आपण सर्वांनीच "जलनेती' नावाची; तसेच भस्त्रिका, कपालभाती, या शुद्धिक्रिया करणे आवश्‍यक आहे. प्रदूषणाचे दुष्परिणाम, घशाचे विकार व जंतूंपासून होणाऱ्या अनेक विकारांवर या शुद्धक्रियांचा वापर प्रभावी ठरतो. भरपूर पाणी पिणे, गरम दुधात हळद घालून घेणे, हिरव्या ताज्या पालेभाज्या खाणे, फक्त सिझनल त्या-त्या ऋतूंमध्ये मिळणारीच फळे खाणे, गर्द हिरव्या व लाल-पिवळ्या भाज्यांमध्ये बीटा कॅरोटीन असते, ते अत्यंत प्रभावी अँटिऑक्‍सिडंटचे काम करते- रखवालदारासारखे. जंतूंसाठी लसूणदेखील असाच पॉवर हाऊस, कलिंगड, स्ट्रॉबेरी, कोबी, फ्लॉवर व मुळा; तसेच शिरांच्या भाज्या, कांद्यामध्ये असलेले क्वरसेटिन हे अँटऑक्‍सिडंट, पिस्ते-आक्रोड व तीळ यात असलेले हे सगळे पदार्थ आलटून-पालटून रोजच्या खाण्यात ठेवणे महत्त्वाचे आहे. दही हादेखील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ. कांदा, सोयाबीन, कडधान्ये, सबंध धान्य, लिंबू व संत्रे, ई जीवनसत्त्वासाठी मारगारीन, गोड बटाटे, गाजर (बिटा कॅरोटिनसाठी), लोहासाठी तीळ; अशा पदार्थामुळे रोगप्रतिकारपुष्टी मिळते व ती यंत्रणा कार्यक्षम होऊन पुष्टिवर्धक बनू शकते. अशी दक्षता प्रथमपासूनच घेतली तर वरील सर्व आजारांशी आपण समर्थपणे सामना करू शकतो व त्यांना दूर ठेवू शकतो.
-डॉ. नितीन उनकुले

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed