प्रेमकथा
सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!
प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!
प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठीराजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!
प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!
एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!
3 comments:
का हो इतके निराशावादी?
premache barech pahlu aahe ha kadachit tyatla ek asava!
pan aaplya nashibi uttam prem yave hich prathana
कवितेतल्या सर्वच गोष्टी स्वतः सोबत घडलेल्या नसतात :)
Post a Comment