Sunday, June 21, 2009

मुंबई शहरं आणि माणसं

सकाळचे आठ. ठिकाण दादर रेल्वेस्टेशन. खटडक् खटडक् खटडक् आवाजात लोकलचा प्रवेश. शेकडोंची गर्दी. उतरणाऱ्यांची, चढणाऱ्यांची घाई. मग एकामेकांना खुन्नस. यात कसा बसा मी चढलो. जागा भेटली. लोकल सुरू. डब्यात कित्येक जण उभे. जागा कमी-माणसं जास्त. काही उभ्यानेच डुलक्या घेतायत, कुणी उरलेला अभ्यास करतोय, कुणी कादंबरी वाचतोय तर कुणी तंबाखू चोळतोय. गेल्या दोन महिन्यात कित्येकांना अशा उरलेल्या गोष्टी अगदी उरलेल्या आयुष्यासकट संपवतांना पाहातोय.

संध्याकाळ... दिवस बरा गेला. ऑफिसातून बाहेर पडून सीएसटी स्टेशनवर आलोय. लोकलमधे जाऊन बसलो. भरपूर जागा, माणसं कमी. पण, काही वेळातच चित्र बदललं. पुन्हा तेच. जागा कमी, माणसं जास्त. लोकल सुरू. उभ्या असलेल्या माणसांना बाजूला करत एक भिकारी समोर आलाय. पिकलेले केस. जाडजूड चेहरा. हसताना तोंडातले दोन-चार दात साथ सोडून गेल्याचे दिसताहेत. उभं राहता येईल एवढी जागा त्याने तयार केलीय. गळ्यात अडकवलेल्या ढोलवर सराईतपणे थाप मारून चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणून तो गातोय. मधेच थांबून, 'दिल बोला तो देनेका, नहीं तो इष्टाइल में रहेनेका!' हे त्याचं वाक्य सगळ्यांना आकर्षून घेत आहे. काही क्षणातच त्याच्या कटोरीत नाण्यांचा आवाज यायला लागलाय. तो खुश. त्याने हसून सगळ्यांना धन्यवाद दिलाय. माझं स्टेशन आलं. उतरलो...

दुसरा दिवस. ठिकाण दादर स्टेशन. पुन्हा गर्दी. चढणारे-उतरणारे. कसा बसा चढलो. शर्टाचं बटन तुटलं. खांद्याजवळ थोडंसं घासलंही गेलं. बसायला जागा नाही. आज माझ्यासकट माणसं खूप-जागा कमी. पाच फुटाच्या दरवाज्यात जवळपास बारा माणसं लटकून उभी! घामाचा वास, गमीर् यात कसंसं व्हायला लागलंय. ऑॅफिसात पोहोचलोय. अचानक कळलं आज कशाची तरी सुट्टी. मग दिवसभर फिरायचं ठरवतोय.

संध्याकाळी दादर चौपाटीवर बांधलेल्या कठड्यावर गेलो. अंगावर लाटांचे तुषार उडत होते. समोर एक माणूस उभा होता. आजूबाजूला त्या व्यक्तीशिवाय कुणीच नव्हतं. निळ्या रंगाची कॅप, अंगात जीर्ण शर्ट, पॅण्ट मुडपून गुडघ्यापर्यंत आणलेली. नुकतीच ओहोटी झालेली होती. काही वेळाने ती व्यक्ती खाली उतरली आणि किनाऱ्यावर तरंगणाऱ्या कॅरिबॅग्ज गोळा करणं सुरू केलं. मग तिने त्या कॅरिबॅग फोडायला सुरुवात केली. त्यातून फुलं, अगरबत्त्या, इतर पूजेचं सामान आणि राख खाली पडायला लागली. त्या व्यक्तीची बोटं जलद गतीने त्या बॅग्जमधल्या राखेमधे घुसत होती. त्याला काहीतरी सापडत होतं. पटापट तो त्या वस्तू खिशात कोंबवत होता. सगळ्या कॅरिबॅग संपल्यानंतर तो रस्त्याच्या दिशेने चालू लागला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. प्रेताला अग्नी दिल्यावर त्या प्रेताची राख समुदात सोडलेल्या नातेवाईकांना माहीत असेल का हे सारं? कसं हे भयानक आणि अंतर्मुख करणारं. कोण होती ती व्यक्ती? केव्हापासून करत असेल तो हे सारं? उपजीविकेचा धंदा असेल का तो? स्वत:च्या जगण्यासाठी कुणाच्या तरी मृत्यूची वाट पाहणं, किती भयंकर आहे. गुजरातमधील कांडला बंदर चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उध्वस्त झालं होतं. सरकारने मदत जाहीर केली. मृत मजुरांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये देण्याचं ठरलं. गावाकडचे नातेवाईक कांडलाकडे रवाना झाले. आपल्या मृत व्यक्तीला घेऊन जायला आलेल्या काही नातेवाईकांना मात्र प्रेतं भेटलीच नाहीत. मग प्रेतांचा शोध सुरू, मग, माहिती मिळाली, की रात्रीतून आम्हीच या प्रेताचे नातेवाईक, असं सांगून प्रेतं विकण्याचा धंदा करण्यात आला होता. किती हे दुदैर्व त्या मृत मजुरांचं? जिवंत असतांना तोकड्या रुपयांवर काम करणाऱ्या त्या मजुरांची मेल्यानंतर किती किंमत वाढली होती.

वाढत जाणारी शहरं आणि माणसं. कुणालाच कुणाचं सोयरसुतक नाही. आधुनिकता लादणारं हे युग. मुंबईसारखं शहर वाढणारं... अन् वाढवणारं. या शहरात माणसाची कमी नाहीच फक्त संवेदनशील मनांची कमतरता आहे. स्टेशनसमोर भीक मागणारा तो वृद्ध, रस्त्याने जाणाऱ्या चकचकीत गाड्या, थांबून राहणारं ट्रॅफिक, त्याच ट्रॅफिकमधे अडकलेल्या अॅम्ब्युलन्स, शाळेत मुलांना सोडायला आणि घ्यायला जाणारे पालक, या मॉड शहरात अंगावर चाबूक मारून घेणारे पोतराज, पोटात अन्नाचा कण नसतानाही टाय लावून फिरणारे बँकांचे प्रतिनिधी, पुलाखाली बसून नशा करणारे गर्दुल्ले, शरीर विक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमागे गोंडा घालणारे उच्चभ्रू, असंख्य लोकाना घेऊन फिरणाऱ्या लोकल्स, पंचतारांकित हॉटेल्समधल्या श्रीमंतांच्या पार्ट्या तर कुठे शेकडो झोपडपट्ट्यांचं उध्वस्त जिणं. हे सारंच सुरू आहे. ठरल्याप्रमाणे किंवा ठरवल्याप्रमाणे...

शहर इतकंही छोटं नको, की प्रत्येकाला प्रत्येकाचं जिणं माहीत होईल आणि इतकंही मोठं नको, की ज्यातून वैयक्तिक ओळखच हरवून जाईल, हे तत्त्वचिंतक अॅरिस्टॉटल यांचं वाक्य मुंबईच्या गंभीर परिस्थितीला समजून घेण्यासाठी पुरेसं आहे, असं वाटतंय. या वेळी मात्र शेकडो प्रश्न उभे राहतात, दलितांना आरक्षण नको म्हणताना दुसरीकडे दलित स्त्रियांची अब्रू लुटण्याचं कमी झालंय? त्यांच्या वरचे अत्याचार कमी झालेत का? गांधीजींच्या देशात अल्पसंख्य ख्रिश्चनांना मारणारे, त्यांची घरंदारं उध्वस्त करणारे आले कुठून? इथे माणूस मरताना दिसत नाही! किती दिवस चालायचं हे सगळं? हातावर जगणाऱ्यांचं काय? चैत्यभूमीवर राख चिवडणारी ती व्यक्ती कशी जगत असेल? अण्णाभाऊ साठेंच्या कथेतला प्रेतं उकरणारा भिमा अन् या आधुनिक मुंबईतला राख चिवडणारी ती व्यक्ती, हे चक्र असंच सुरू राहणार का? श्रीमंत हा श्रीमंतच होत जाणार अन् गरीब गरीबच का? अजूनही नोकरीची वाट पाहणारे मिल कामगार? हे सगळं किती विचार करायला लावणारं आहे, पण हे राज्यकर्ते काय करताहेत? कितीही अवघड परिस्थिती आली, तरी त्यांनाच पुन्हा निवडून का दिलं जातं? पैशासाठी, बाटलीसाठी की जातीसाठी? काहीच कळत नाही. नेमकं कुणाला द्यावं हे जग चालवायला? 'उस आदमी को सौप दूँ दुनिया का कारोबार, जिस आदमींके दिल मे कोई आरजू ना हो,' या ताहीरच्या ओळींचं महत्त्व आता खरं वाटायला लागलंय. पण असा माणूस आणायचा कुठून?

तिसरा दिवस. लवकर उठलोय. आवरलंय. बाहेर आलोय. रस्त्यावरच्या बिहारीकडून चहा प्यायलो. स्टेशनमधे आलो. थोड्याच वेळात लोकलचा प्रवेश. रेल्वे सुरू. खटडक् खटडक् खटडक्...


No comments:

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed