Sunday, June 21, 2009

तो चिमुकला चेहरा

सिग्नलपाशी रिक्शा थांबली. उजवीकडून चिमुकला हात पुढे झाला. चेहरा बघायच्या आधीच सणसणीत शिवी हासडली. चटका बसल्यागत हात मागे. नजरेचा जाळ फेकण्यासाठी मान वळवली. समोर भेदरलेला चेहरा. चार-पाच वर्षांच्या मुलीचा.

पाचवी-सातवीत असतानाचा किस्सा. दोन रुपयांच्या दोन करकरीत नोटा कपाटातून 'उचलल्या' होत्या. चॉकलेटसाठी अशी उचलेगिरी बहुतेक वेळा ठरलेली. आईची नजर चुकवून घराबाहेर पडलो आणि 'ती' दिसली... चाळीच्या गेटवर कपड्यांच्या लक्तरात गुंडाळून बसलेली, कडेवर शेंबडं पोर. नजरेत व्याकूळ भाव. हात पुढे न करताही काहीतरी मागणारे. ती नजर चुकवून पुढे आलो. अशांना बाबा कधीतरी पैसे काढून द्यायचे ते आठवलं.

वाण्याकडे आलो. चार रुपयांचं 'डेअरी मिल्क' घेतलं आणि निघालो. थोडं पुढे जाताच पाय थांबले. गेटवर 'ती' असली तर? तिच्यासमोर चॉकलेट खात जाणं बरं दिसणार नाही. खिशातलं चॉकलेट बाहेर काढलं. खावंसं मात्र वाटेना. 'ती'चा चेहरा दिसत होता... गलबलून आलं. वाण्याकडे परतलो. डेअरी मिल्क परत करून साधी चॉकलेटं आणि दुसरी नोट परत घेतली. गेटवर ती होतीच. निमूट खिशातली नोट तिला दिली. व्याकूळ नजर हसली. मलाही बरं वाटलं...

' भिकारी' या व्यक्तीशी माझी पहिली 'वन टू वन' ओळख ही अशी... चोरलेले का असेनात, त्या भिकारणीला आपण पैसे दिले याच्या कौतुकाने कितीतरी दिवस हुळहुळत होतो... शाळेत जाता-येताना, आईबाबांबरोबर बाहेर जाताना, रस्त्यावर दिसणाऱ्या 'त्यांच्या'कडे बघणं मी टाळत नसे. फूटपाथवर, रस्त्यांवर झोपलेले हे भिकारी पावसाळ्यात काय करत असतील? भीक मिळाली नाही, तर काय खात असतील, अशा प्रश्नांचं काहूर माजे. बऱ्याच वेळा बाबांना सांगून मी त्यांना भीक द्यायला लावी. कधी माझ्या खिशातूनही चार-आठ आणे 'त्यां'च्या वाडग्यात पडत.

शाळा संपून कॉलेजलाइफ सुरू झालं, तरी भिकाऱ्यांबाबतचा कळवळा होता. चार आण्यांची जागा रुपया-दोन रुपयांनी घेतली. भीक देताना मात्र 'वगीर्करण' सुरू झालं. पहिला प्रेफरन्स म्हाताऱ्यांना, नंतर लुळ्यापांगळ्यांना आणि शेवटी 'देवाघरची फुले' असणाऱ्या मुलांना. धडधाकट भिकारी लिस्टमधून कधीच कट झाले होते!

नोकरी लागल्यानंतरही बदल झाला नाही. उलट भीक देण्यासाठी आता हक्काचे पैसे होते. स्टेशनात ज्यूस पिताना, वडापाव खाताना सामोर हात पसरून उभे राहणाऱ्या पोरांना, चायनीज गाड्यांभोवती उरलंसुरलं गोळा करत फिरणाऱ्यांना सहसा निराश करत नसे.
काही महिन्यांपूर्वी गोरेगावला शिफ्ट झालो. भिकाऱ्यांचं नवंच विश्व पाहत होतो. घर ते रेल्वे स्टेशनपर्यंत दोन सिग्नल शिवाय स्टेशनचा लास्ट स्टॉप. 'त्यां'ची व्हरायटीच पाहायला मिळायची. मुलं, 'बॅकअप'ला त्यांचे पालक... 'मालक' म्हणा हवं तर, म्हातारे हवे असतील तर तेही आणि हो, छक्क्यांची गँगही. भीक मागताना बिनदिक्कत स्पर्श करणारे. भसाड्या आवाजात 'बाबू... राजू' करत हक्क असल्याप्रमाणे पैसे मागणारे. नाही दिले तर अगम्य भाषेत शिव्याशाप देणारे. रोज तेच तेच 'धंद्यावर' बसलेले भिकारी... सगळ्याचा उबग येत गेला. भीक मागायला पुढे सरसावलेल्यांकडे तुच्छतेने बघणं, न बघणं जमू लागलं... हळूहळू 'कोरडा' होऊ लागलो होतो.

दिवाळीच्या आधीचा प्रसंग...

ऑफिसला जातानाची नेहमीची घाईगडबड. घरातून निघताना झालेला उशीर. पाचवीला पूजल्याप्रमाणे बस लेट. मग रिक्शा केली. डोक्यात राग होताच सिग्नलपाशी रिक्शा थांबली. उजवीकडून चिमुकला हात पुढे झाला. चेहरा बघायच्या आधीच सणसणीत शिवी हासडली. चटका बसल्यागत हात मागे. नजरेचा जाळ फेकण्यासाठी मान वळवली. समोर भेदरलेला चेहरा. चार-पाच वर्षांच्या मुलीचा. 'साहेबा'ला नाराज केल्याची बोच. 'धंदेवाईक'पणा अजिबात नाही. माझी नजर खाली गेली पण खिशात हात गेला नाही. सिग्नल सुटला आणि त्या मुलीचा संबंधही...

दुसऱ्या दिवशी सुट्टी होती रविवारची. पण झोपेत 'ती'चा चेहरा आठवला. तो दिवस अस्वस्थेत गेला. जेवताना, टीवीवरचे कार्यक्रम बघताना, कॉलनीत खेळणाऱ्या मुलांशी बोलताना ती बोच कायम होती. 'कोरडं' मन ओलावू लागलं होतं.

दुसऱ्या दिवशी मुद्दाम रिक्शा केली. सिग्नलपाशी ती नव्हती. तिसऱ्या दिवशीही तेच. चौथ्या दिवशीही नव्हती. रिक्शा सोडली. सिग्नलजवळच्या पेपरवाल्याकडे सहज चौकशी केली. त्यालाही ती मुलगी माहीत असण्याचं कारण नव्हतं. 'परवा तो राडा झाला ना साहेब, त्यानंतर इकडचे बरेच भिकारी कमी झाले. बहुतेक गेले असतील यूपी-बिहारला परत,'... पेपरवाला सहज म्हणाला.

शरमेची जागा अपराधीपणाने घेतली.... 'तो' चेहरा आणखी छळणार होता... निदान काही दिवस...

मन पुन्हा 'कोरडं' होईपर्यंत.

1 comment:

भानस said...

असे चिमुकले असंख्य जीव भिकेच्या मोलमजुरीला लावून आरामात जगणारे दलाल, त्यांचे आईवडील..... देवा,काहीतर कर रे....सोडव त्यांना.
तुझं गलबलण अन तिची हसलेली व्याकूळ नजर...:)आजही तुझ्या मनाला बरं वाटतयं...:)

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed