Wednesday, June 10, 2009

प्रेमात पडावंसं प्रत्येकाला वाटतं

प्रेमात पडावंसं प्रत्येकाला वाटतं, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने लोक प्रेमात पडतात. कधी अनेक वर्षं ओळख असते आणि अचानक जाणवतं, अरे यार, आपण प्रेम करतोय याच्यावर! तर कधी कधी अगदी पहिल्या भेटीतच तारा जुळतात...

मला असं वाटतं, की प्रत्येक पिढीची प्रेम व्यक्त करण्याची एक स्टाइल असते. ती जुन्या पिढीसारखी असू नये याबाबत आपण एकदम अलर्ट असतो. तरुणाईतली ती कदाचित पहिली बंडखोरी असते. भर उन्हात रस्त्यातून हात पकडून चालणं असो, की सीसीडीमध्ये टाइमपास करत बसणं असो, त्याला किंवा तिला अनेक एसएमएस लिहून खोडणं असो, की त्याच्या किंवा तिच्या नावाचे इनिशियल्स वहीत गिरवणं असो, शॉपिंग मॉलमध्ये काहीही न घेता फिरत राहणं असो की, लेक्चर चालू असताना एकमेकांना मिसकॉल देणं असो... आपल्याला आपल्या पद्धतीने सेलिब्रेट करायचं असतं आपलं प्रेम...

कॉलेजच्या कट्ट्यावरचे दिवस संपले की प्रेम संपून जात नसतं. ते आपल्याला विविध वळणांवर थोडं अधिक मॅच्युअर होऊन भेटत असतं. कधी कॉलसेण्टरच्या खिडकीतून कोणी पाच मिनिटं काढून आभाळाकडे बघत बसतं आणि जाणवतं याच्याशी होऊ शकेल आपली मैत्री, कधी रस्त्यावर आपली जुनी गर्लफ्रेण्ड भेटते आणि तिच्याशी गप्पा मारल्यावर अजूनही आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत याचं समाधान मिळतं. कधी रेस्तराँमध्ये बसल्यावर समोरच्या टेबलवर बसलेलं स्वत:मध्येच रममाण असणारं कपल दिसतं, तर कधी थकून घरी आल्यावर नवऱ्याने स्वयंपाक करून ठेवलेला असतो. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असे प्रेमाचे क्षण अनेकदा येत असतात, फक्त आपण कधी कधी त्या क्षणांना महत्त्वच देत नाही. ते येतात अन् जातात. त्यांचे आपल्याला भूलवणं चालूच असतं. आपण कामाच्या आणि गदीर्च्या व्यापात विसरून जातो. लोकलमध्ये चढल्यावर ती गाडी दिसेनाशी होईपर्यंत कुणी आपल्यासाठी हात हलवत होतं, हे कळतच नाही. ऑफिसच्या डेली मेल्जमध्ये रोज हायकूची मेल येते, ती कोण करतं आपण बघायचेही कष्ट घेत नाही. गर्लफ्रेण्डसाठी नवीन टी-शर्ट घेताना आपल्याला लक्षातही नसतं तिला कोणता रंग आवडतो... त्याच्या रुटीनची आपल्याला इतकी माहिती होऊन जाते की, कधी सरप्राइज द्यायला तो लवकर आला तर आपल्याला वाटतं मीटिंग कॅन्सल झाली असेल.

मग हे क्षण घरंगळतात, आपल्यावर रुसतात, त्यांना ठोकताळ्यात बसवलं म्हणून अबोला धरतात आणि हळूहळू हरवून जातात. प्रेमाला नाही आवडत बांधलेपणा किंवा चौकट. त्याला त्याच्या पद्धतीने फुलायचं असतं, उमलायचं असतं. एक गुलाबाचं लाल फुल देऊन प्रपोज करण्यापेक्षा साधं सरळ अडखळत विचारणं त्याला आवडतं, दर फ्रायडेला गर्लफ्रेण्डला घेऊन पबमध्ये जाण्यापेक्षा अचानक कधीतरी लाँग ड्राइव्हवर जाणं आवडतं, पिक्चरपेक्षा शांत बसून गप्पा मारलेल्या आवडतात. शॉपिंगपेक्षा शेअरिंग आवडतं, हक्कापेक्षा मोकळीक आवडते आणि मला वाटतं, की हे प्रेमाचे क्षण आपण नेहमी हरवून बसतो ना म्हणूनच Valentine day चा जन्म झाला असेल... आपल्याला ही जाणीव करून द्यायला की, पुढचं वर्ष तरी आपण प्रेमाचे हे अनमोल क्षण मिस करू नयेत...

No comments:

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed